डोंगर, दऱ्या, गड, किल्ले यांना भेटून सुमारे ०५ महिन्याचा दीर्घ कालावधी लोटला, शेवटची भेट घेतली होती ती किल्ले रामशेज व कळसूबाईची त्यांनतर दररोज काहीतरी चुकल्याची वेळोवेळी जाणीव होतेय, मनात तीव्र इच्छा कुठेतरी बाहेर डोकावत होती "नाय रे तू नाही राहू अस बाहेर उनाडक्या केल्या शिवाय, हे गड किल्ल्यांचे व्यसन नाय रे सुटत सहजा सहजी, ही सह्याद्रीची माया लय वंगाळ, कुणाला आपलेसे केलना तर गठ्ठ केलेले नाते नाय तोडत सहजासहजी, ती तर दिवसेंदिवस वेड्यांना स्वतःकडे आकर्षित करीत असते त्याला तू तरी कसा अपवाद असशील".
हे आमच फिरण, बागडन आम्हाला काही महिन्यासाठी जगण्याची नवसंजीवनी देत असते, ज्यामुळे आमच्या शरीराचा व्यायाम, मनाचा व्यायाम होतो जो आम्हाला दिर्घकाळ टिकतो. मेडिटेशन, प्राणायाम, योगा आमच्यासाठी सर्वकाही हेच की, वारकऱ्याला जेवढा आनंद विठ्ठलाला पायी पंढरी हो पायी पंढरी गाठल्यावर पाहून होतोना तेवढाच आंनद आम्हाला हे दुर्ग, किल्ले समोर पाहिल्यावर होतो, ही थकवणारी डोंगरवारी आम्हाला काही महिने तरी आजारापासून दूर ठेवते याचा अनुभव मी सध्या चांगलाच घेतोय कारण शरीर, मन लहान सहान आजाराने ग्रासले जातय, कधीही न येणारा थकवा शरीराचा ताबा घेवू पाहतोय.
हीच भटकंती आम्हाला काहीतरी नवीन करण्याला प्रवृत्त करते, नवा जोश, आत्मविश्वास आमच्यात भरते, इतिहासाच पावित्र्य जपायला मदत करते यानिमिताने तरी इतिहास मांडायची, अभ्यासाची उजळणी होते, घडलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात अगदी जसेच्या तसे, ही भटकंती आम्हाला निसर्गाशी एकरूप करते, नवनवीन पक्षी, प्राणी, फळे, फुले, नवीन गावे, वाड्या, वस्त्या, तेथील राहणीमान यांची ओळख होते ती वेगळीच, कधी एखाद टेकाड पार करून उंचावर जी थंडगार झुळूक अंगावर येतेना जिच्यामुळे शरीरावर वेगळेच आल्हाददायी रोमांच उभे राहतात, मेंदूमध्ये एक वेगळीच झिंग येते व या झिंगेबरोबर मेंदूवरील गंज, क्षीण, मळभ सर्वकाही काही क्षणात लोप होवून वेगळीच नशा मस्तकात शिरते, तिचा अनुभव नाय विकत घेता येत हो ACत बसून, आपले आभासी मित्र फेसबुक्या, इंस्टाभाई, व्हाट्सप्पा, ट्वीटया, गुगल्या दादा यांच्यावर एखादा फोटो पाहून तुमच्या तोंडून वाव... हे शब्द अचानकपणे उच्चारले जातात, तर आम्ही ते प्रत्यक्षात पाहिल्यावर, अनुभवल्यावर काय वाटत असेल याची कल्पना करा, त्या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात जगत असतो तिथे वावरत असतो याला वेडेपणा कसा म्हणता येईल हो. आमची ही भटकंती म्हणजे बोंबळत फिरण मुळीच नाही, यात सुद्धा दोन प्रकार एक मौजमजा करणारे व दुसरे आमच्यासारखे भटके, तुम्ही जे मौजमजा करायला, पेग रिचवायला जातात ना, त्यांच्याच रिकाम्या बाटल्या, वेफर्सचे रिकाम्या पाकिटाची विल्हेवाट लावणारे आम्ही डोंगरसखे.
एखादे ठिकाण निश्चित करून त्याच्या दिशेने पाठीवरील बॅगेमध्ये भलामोठा संसार व जिवाभावाच्या मित्रांचा लवाजमा घेवून मार्गक्रमण केल्यानंतर काही तासाने अंग घामाने पूर्ण भिजून जाते, पायातील जीव नाहीसा होतो, पोटरीचे गोळे पुढे पाय टाकू देत नाही इथेच तर खरी कसोटी चालू होते शरीराची अगदी मनाची सुद्धा, आता फक्त पाणी पिवून एखाद्या वटवृक्षाच्या सावलीत निपचित पडावेस वाटत तो अंतरआत्मा तृप्त होईपर्यंत, पण काही क्षणांची उसंत घेवून मन कठोर बनवावे लागते, शरीराचे लाड बंद करून त्यास द्याव्या लागतात पुनःश्च त्याच नकोश्या यातना, चालु होतो पुन्हा तोच खेळ मजल दरमजल करीत पण यामध्ये उत्साह तोच असतो जो पहिले पाऊल टाकल्यावर असतो काय विशेषतः म्हणावी लागेल ना ? कारण आपल्याला कोणी भाड्याने अगर कोणते आमिष दाखवून इकडे आणलेले नसते तर आपण स्वतःहून स्वतःला आजमावायला इकडे आलेले असतो, तेवढ्यात आपले अंतिम लक्ष आपल्याला दिसल्यावर आपल्याला पायांचा वेग कसा झपा... झप... वाढतो व पायातील जीव, पोटरीचे गोळे कसे नाहीसे होतात हे न उलगडलेले कोडेच म्हणावे लागेल ! त्यात काही जुने मित्र असतात काही नवीन भेटतात, जे आपल्याला कधीही हरलेले न पाहणारे, आपल्याला सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत "चल बे थोडच राहिलय" म्हणत सोबत घेवून जाणारे, अखेर निसर्गाच्या लेण्याने डोळ्याचे पारण फेडीत फेडीत पोहचतो आपल्या इच्छित स्थळी, काय तो आनंद स्वतःवर विजय मिळवल्याचा अगोदर हतबल झालेला मी शेवटी अथक प्रयत्नाने विजयी झालो केवढी ही इच्छाशक्ती ही आली कोठून, हे करायला कोणी प्रेरित केले, कसे शक्य झाले हे याच एकच उत्तर ते म्हणजे माय माऊली सह्याद्री फक्त तीच पावित्र्य जपा जसे शक्य असेल तस ही विनंती.
अरे मी शिवबाचा मर्दमावळा, सोबत सह्याद्रीचा अल्लड वारा
कनवाळू मायेच्या कुशीत चाले, हा भटकंतीचा उनाड खेळ सारा
दिसता बुरूजावर ध्वज भगवा, थकलेल्याचाही उत्साह भिडतो गगनाला
मंग कसा रोखेल हा सूर्य तळपता, मज शरण सुद्धा ह्या जलधारा.
Post a Comment