Facebook SDK

jaswant singh rawat in marathi

Tags - जसवंतगड वॉर मेमोरियल (Jaswantgarh War Memorials | Jaswant Singh Rawat marathi |jaswant singh rawat in marathi | jaswant singh rawat information in marathi

आवर्जून वाचावे अस काही.

जसवंतगड वॉर मेमोरियल Jaswantgarh War Memorials


प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.
तवांगच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर नुरानाँग गावापासून जरा पुढे आलो की लांबूनच  ‘जसवंतगड वॉर मेमोरियल’ दिसायला लागते. 

लष्कराच्या कडक शिस्तीतले एक स्वच्छ सुंदर युद्धस्मारक. स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते. चबुतऱ्यावर पुढील ओळी नमूद केलेल्या असतात..

आहवे तु हत: शूरं,

सोचयेतं न कथंचन: !

अशोच्यो हि हताशूर:,

स्वर्गलोके महीयते !!

याचा अर्थ असा जे वीर लोक युद्धात मारले जातात त्यांच्याकरिता शोक करू नये, कारण वीरपुरुषांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाल्यानंतर स्वर्गामध्ये त्यांना आदर प्राप्त होतो. 

भारत-चीन युद्धात असामान्य कर्तृत्व गाजविणारा भारताचा एक सैनिक ‘फोर गढवाल रायफल्स’मधील रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले हे सर्वागसुंदर युद्धस्मारक. भारतीय लष्कराचे प्रार्थनास्थळ!

डाव्या बाजूला असलेल्या दहा पायऱ्या वर चढून गेलो की समोरच त्यांचा अर्धपुतळा आपले लक्ष वेधून घेतो. तसेच डाव्या हाताला त्यांची झोपण्याची गादी व त्यांचा फोटो. उजव्या हाताला त्यांनी युद्धात वापरलेले साहित्य व्यवस्थितरीत्या  मांडून ठेवलेले दिसते. 

या युद्धस्मारकाच्याच पाठीमागे लांबलचक बंकरच्या बरोबरीने थोडे उंचावर गेलो की ‘जय बद्री विशाल’ अशी त्यांच्या मंदिरावरची अक्षरे दृष्टीस पडतात व त्याच्या बरोबर खाली तीन स्वच्छ पितळी घंटा. याच ठिकाणी जसवंतसिंग रावत यांचे मंदिर निर्माण करण्यात आलेले आहे. आत जाताच आपण त्या शूरवीरापुढे नतमस्तक होतो.

jaswant singh rawat story in marathi

jaswant singh rawat story in marathi

शूरवीराचे दर्शन घेऊन बाहेर येताच भारतीय लष्करातील या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्या मराठी मातीतले कोल्हापूरचे लान्स नायक नामदेव हजारे आपल्या रसाळ वाणीने युद्धाचा इतिहास कथन करायला लागतात. सन १९६१ मध्ये हिंदी-चिनी भाई-भाईचे नारे दिले-घेतले गेले. 

परंतु, चीनने आपला शब्द पाळला नाही. आपल्या देशाच्या सीमा सक्षम असाव्यात म्हणून सन १९६२ मध्ये अरुणाचल प्रदेशातील ‘धौला’ या ठिकाणी भारताने आपली लष्करी ठाणी उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. कारण, भारतीय स्वातंत्र्यानंतर मॅकमोहन लाइनच्या अलीकडे भारताने फारशी लष्करी ठाणी उभारलेली नव्हतीच. 

भविष्याचा विचार करता या ठिकाणी लष्करी ठाणी उभारणे गरजेचे होते. त्यामुळे या ठिकाणी भारतीय लष्कराच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या त्या स्वसंरक्षणासाठी. पण त्या लष्करी हालचाली चिनी सैन्याच्या नजरेत भरल्या आणि त्यांचा समज असा झाला की भारतीय सैन्य चीनवर हल्ला करण्याची तयारी करीत आहे. हे फक्त निमित्त झाले. 

खरे कारण म्हणजे, दलाई लामांना भारताने १९५९ मध्ये आश्रय दिल्यामुळे चीनमध्ये हिंसक घटना वाढायला लागल्या होत्या, त्याचा भारतावर राग होताच, त्यामुळे चीनने लगेच लष्कराच्या हालचाली सुरू करून अरुणाचल प्रदेशातील धौला येथील सीमेवरून १७ ऑक्टोबर १९६२ ला भारतावर आक्रमण केले.

चिनी सैन्याने सर्व तयारीनिशी भारतावर हल्ला चढविला. त्या वेळी आपण गाफील होतो. सीमेवर आपले अगदी तुटपुंजे सैन्यबळ होते. त्याचाच फायदा घेत अरुणाचल प्रदेशातील तवांगमधून गावकऱ्यांच्या वेशात घुसखोरी करीत चिनी सैन्याने जोरदार मुसंडी मारली.

चिनी सैनिक गावकऱ्यांच्या वेशात येत आहेत याची माहिती सेला व नुरा या दोन मैत्रिणींनी नुरानाँग गावातील लष्करी ठाण्यावर तैनात असणाऱ्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांना दिली. 

या मिळालेल्या माहितीवरून त्यांनी नुरानाँग येथील या लष्करी ठाण्याच्या लांबलचक बंकरमधून अनेक ठिकाणांवरून हातबॉम्ब फेकून या ठिकाणी अनेक भारतीय सैनिक असल्याचा आभास निर्माण करत हे ठाणे सलग ७२ तास लढविले व ३०० चिनी सैनिकांना त्यांनी कंठस्नान घातले. त्या वेळी चिनी सैनिकांना वाटले की या लष्करी ठाण्यावर भारताचे खूप सैनिक असावेत. त्यामुळे ते पुढे येण्याचे धाडस करत नव्हते. 

हे सुद्धा वाचा - 

खालच्या बाजूला भारतीय लष्करी ठाण्यासमोरच तैनात केलेल्या एमएमजीमधून चिनी सैन्य सतत गोळ्यांचा वर्षांव करत होते. रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांनी चिन्यांच्या एमएमजीजवळ जाऊन त्यावर हातबॉम्ब फेकून अखंड धडाडणारी ती एमएमजी शांत केली. 

सेला व नुरा यांनीही जसवंतसिंग यांना दारूगोळा आणून देण्यास मदत केली. या ठिकाणच्या उंचावरील खणलेल्या लांबलचक बंकरमधून कधी इथून तर कधी तिथून अशा प्रकारे एकटय़ा जसवंतसिंग यांनी सलग ७२ तास चिन्यांशी युद्ध करत तीनशे चिनी सैनिकांना यमसदनी धाडले. 

jaswant singh rawat information in marathi

 jaswant singh rawat information in marathi


एकटय़ा सैनिकाने तीनशे सैनिकांना ठार मारणे हे भारतीय युद्धाच्या इतिहासातील एक अपवादात्मक उदाहरण आहे.  
खरे तर त्या वेळी त्या तीनशे सैनिकांपाठोपाठ चिनी सैन्याचे सुमारे सहा हजार सैन्य जय्यत तयारीनिशी आगेकूच करीत होते.

पण ज्या वेळी त्यांनी पाहिले की भारताकडून आपल्याला जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे तेव्हा या ठिकाणी भारताचे खूप सैन्य असले पाहिजे असा अंदाज घेत काही स्थानिक गावकऱ्यांना पकडून त्यांचा छळ करत चौकशी सुरू केली. 

सेलाच्या वडिलांनाही चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले व त्यांचा छळ केला. यातनांनी असहाय झालेल्या सेलाच्या वडिलांनी त्यांना सांगितले भारताच्या लष्करी ठाण्यावर फक्त एकच सैनिक आणि सेला व नुरा आहेत. तो एक सैनिकच गोळीबार करून हातबॉम्ब फेकत आहे. 

हे समजताच चिनी सैनिकांनी रायफलमॅन जसवंतसिंग यांना पाठीमागे जाऊन घेरले आणि जखमी अवस्थेत पकडून त्यांना गळफास देऊन मारले.

त्यातील एक अतिउत्साही चिनी अधिकारी जसवंतसिंग यांचे शिर कापून घेऊन चीनमध्ये गेला. खरे तर ही घटना युद्धनीतीला धरून नव्हती. कारण, युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकाला सन्मानपूर्वक दफन करण्याची प्रथा होती. परंतु या प्रकाराने त्या अधिकाऱ्याचे कोर्टमार्शल झाले. 

तोपर्यंत चिनी सैनिकांनी तवांगवर कब्जा करून त्यांनी तेजपूपर्यंत धडक मारली होती. तद्नंतर चिनी सैनिकांनी सेलाला ताब्यात घेतले. छळ केला आणि तिला तिथल्याच एका टॉपवर नेले आणि कडय़ावर उभे करून चिनी अधिकारी तिला म्हणाले, 

‘अजून कुठे कुठे भारतीय सैनिक आहेत, ते सांग. अन्यथा, तुला या कडय़ावरून ढकलून देऊ.’ पण बहादूर सेलाने एका बेसावध क्षणी संधी साधली आणि दोन चिनी अधिकाऱ्यांना गच्च मिठी मारत तिने स्वत:ला त्या कडय़ावरून खाली झोकून दिले. त्यात तिचा व त्या दोघा चिनी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. 

नुरा चिन्यांच्या ताब्यात सापडली नाही. परंतु चिन्यांच्या छळाच्या भीतीने तिने तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे तेथील तलाव तेव्हापासून ‘नुरानाँग तलाव’ म्हणून ओळखला जातो. ज्या वेळी शस्त्रसंधी झाली त्या वेळी चिनी अधिकाऱ्यांनी बहादूर रायफलमॅन जसवंतसिंग यांची कथा भारतीय अधिकाऱ्यांना ऐकवली. 

तेव्हा कुठे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना रायफलमॅन जसवंतसिंग यांचा पराक्रम समजला. तद्नंतर यथावकाश लष्कराच्या सर्वोच्च पदकाकरिता रायफलमॅन जसवंतसिंग यांची शिफारस करण्यात आली. परंतु, त्यांना परमवीरचक्र ऐवजी महावीरच देण्यात आले. 

ज्या ठिकाणी सेलाने चिनी अधिकाऱ्यांना घेऊन उडी मारली, त्या ठिकाणाला सेला पास असे नाव दिले गेले. व त्या गावालाही सेला असे नाव दिले गेले. आजही दिरांग ते तवांग हा प्रवास करताना हे गाव आपणास दिसते. या गावात लष्कराचा कॅम्पही आहे.

ज्या तवांगमधून चिनी लष्कर सन १९६२ मध्ये घुसखोरी करत तेजपूपर्यंत आले होते तो मार्ग व ती प्रत्यक्ष युद्धभूमी पाहण्यासाठी आम्ही दहा जण मुंबईहून निघून गौहात्ती-शिलॉंग-तेजपूर-बोमदिला-दिरांग-तवांग असा प्रवास करत करत जसवंतगड वॉर मेमोरियल येथे आलो होतो. 

त्या वेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले लान्स नायक नामदेव हजारे यांनी भारत-चीन युद्धातली ही कथा आम्हाला ऐकवली. आम्ही सारे भारावून गेलो, आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष युद्धभूमीवरील जसवंतसिंग रावत लढले. ज्या बंकरमधून लढले, तो लांबलचक बंकरही दाखविला. 

तसेच चिनी सैनिकांनी त्यांना मागून येऊन त्यांच्यावर हल्ला करून पकडल्यानंतर ज्या वायररोपने त्यांना गळफास देऊन मारले ती वायररोपसुद्धा दाखवली. भारतीय लष्कराने जसवंतसिंग यांच्या बांधलेल्या मंदिरातील झाडावर ती वायररोप गुंडाळून ठेवण्यात आलेली आहे. 

तसेच त्यांनी हेही सांगितले की, आजची परिस्थिती आणि १९६२ची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्या वेळी दोन सैनिकांमध्ये मिळून रायफल असायची तिथल्या प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणासाठी पहारा द्यावयाचा म्हणजे त्यांच्या अंगावर फक्त गणवेश असायचा. 

थंडीपासून रक्षणासाठी कपडे नसायचे. खरे तर सन १९६२च्या त्या भयानक परिस्थितीत एकटय़ाने चिनी सैनिकांशी लढायचे म्हणजे काही खायचे काम नव्हते. पण आपल्या लष्करातील बहाद्दर रायफलमॅन जसवंतसिंग यांनी एकटय़ाने ते करून दाखविले.

हे मंदिर दार्जिलिंग येथे असलेल्या हरभजनसिंगबाबा यांच्या मंदिराप्रमाणेच बांधण्यात आलेले असून या मार्गाने येणारे या मंदिरात दर्शन करून हात जोडल्याशिवाय पुढे कोणीही जात नाहीत. किंवा जाऊ शकत नाहीत, असेही हजारे यांनी सांगितले. आम्हीही त्यांना कडक सॅल्यूट करूनच तेथून निघालो. 

याच ठिकाणी ज्या तीनशे सैनिकांना जसवंतसिंग यांनी कंठस्नान घातले त्यांचे दफन या ठिकाणी केले असल्याचे आजही आपणास पाहावयास मिळते. त्यांनी असेही सांगितले की जसवंतसिंग हे रिटायर्ड होईपर्यंत त्यांचा पगार लष्करातर्फे काढला जात होता. 

तसेच त्यांना वेळोवेळी बढतीही दिली गेली. आजही त्यांचे अस्तित्व त्या ठिकाणी जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय लष्करातर्फे या ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यांना गरमागरम चहाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. लष्करातर्फे देण्यात आलेला गरमागरम चहा व समोशाचा पाहुणचार स्वीकारून आम्ही मार्गस्थ झालो.
©धनराज खरटमल
लोकप्रभा टीम

Tags - जसवंतगड वॉर मेमोरियल (Jaswantgarh War Memorials | Jaswant Singh Rawat marathi |jaswant singh rawat in marathi | jaswant singh rawat information in marathi

Post a Comment

Previous Post Next Post