Facebook SDK

कळसुबाई

कळसुबाई शिखर | kalsubai marathi trek blog | kalsubai peak marathi mahiti information | kalsubai trek | kalsubai shikhar | kalsubai height | kalsubai distance या सर्वांची उत्तरे व आमचा एकाचवेळी दोन किल्ल्यांचा प्रवास, कळसूबाईला राहायला सोय कुठे, खायची सोया कुठे या सर्वांची उत्तरे ह्या kalsubai marathi trek blog मध्ये मिळून जातील..

Kalsubai peak trek
Kalsubai peak trek


Kalsubai peak trek blog

कळसुबाई व किल्ले रामशेज करण्याचा मानस एक रात्र अगोदर पक्का झाला, त्याप्रमाणे 3 मार्चला रुपेश मोरे, मिथुन निगडे यांच्यासह ठाणे रेल्वे स्टेशनला सकाळी 6:45 वाजताच्या दरम्यान DN गोरखपूर अर्थात भैया गाडीच्या प्रतीक्षेत थांबलो ह्या गाडीच्या जनरल डब्यात चढण म्हणजे आशिष नेहराला सूर मारून चौकार अडवताना पाहण्याइतपत अवघड बाब होती,


परंतु नशिब सुरुवात चांगली झाली, केदार जाधवने तो चौकार अडवला, म्हणजेच भैया गाडी अगोदर नांदेड तपोवन गाडी फलाट क्र 5 वरती येण्याची अलॉवन्समेंट झाली, आम्ही मंग गाडी चालू असतानाच त्यातील जनरल डब्यातील दोन जागा पळत पळत बळकावून.


 एका प्रवाश्याचा सुटकेसच्या मदतीने तिघे बसलो, मंग सैराटच्या आर्चीवानी थेट नाशिक घाटल ती ट्रॅक्टरच मुंडक घेवून थेट मळ्यात गेली होती आणि आम्ही रेल्वेच्या मुंडक्यात बसून नाशिकला,


नाशिक CBS एसटी डेपो येथे नाश्ता करून पेठकडे जाणार ठरल्याप्रमाणे महामंडळ पकडल हे आपल्याला आशेवाडी गावाच्या फाट्याजवळ प्रत्येकी 23 रुपयात उतरवतो, येथे उतरल्यावर डोंगराचा आकार पाहून ओळखून जाल कि हाच असावा अजिंक्य किल्ले रामशेज! 


तेथील गावातून मार्ग काढत 5 ते 10 मिनिटात किल्ला चढाई करण्यास सुरुवात होते, किल्ला चढण्यास एकमेव मार्ग आहे व तोही सोप्पा आहे बाकी किल्ल्याची सभोवतालची चढण म्हणजे बापच आहे, कारण येथे चढाई करणे अवगडच त्यामुळे तर औरंग्याच्या 3,4 सरदार व हजारो सैनिकां विरुद्ध हा किल्ला, 

Ramshej fort nashik

Ramshej fort


किल्लेदार सूर्याजी जेधे यांनी 500-600 मावळ्यांसह 5:30 ते 6 वर्ष गनिमी काव्याचा मुबलक वापर करीत लढला, सरदार शहाबुद्दीन खानाने किल्याला समांतर लाकडी मचाण बांधून तोफगोळे डागण्याचा प्रयत्नही असफल झाला परंतु हे ठिकाण प्रत्येक वाटसरूला विचारूनही रुपेश मोरेंना शेवट पर्यंत सापडले नाही, 


गप्पा गोष्टी करीत 40 मिनिटमध्ये वरती पोहचलो, राम मंदिरात तेथील पुजाऱ्याने राम वनवासाला असताना या ठिकाणी त्यांनी शेज (वास्तव) केले, म्हणून याचे नाव रामशेज. याठिकाणी 12 माही पाण्याची 5 टाके तुडुंब असतात व मंदिरात राहायची सोय हि उत्तम आहे खाण्याची सोय आपण स्वतः करावी लागते. 


त्या थंडगार मंदिरात बसल्यानंतर काही महिला तसेच बापे मंडळी बांबूच्या पाटीमध्ये केळाच्या पानात झाकून काहीतरी आणल्याचे दिसल्यावर पुजाऱ्याने किल्याच्या वरच्या भागात देवीचे मंदिर असल्याने लोक धार्मिक विधी करण्यासाठी येतात त्याचाच प्रसाद पाटीमध्ये असल्याच सांगितले, आम्ही तिघे एकमेकांकडे बघत मनोमनी खुश ना भाई, 


चला जेवणाची तरी सोय झाली, गावाला कोणाच्याही वऱ्हाडात जावून पत्रावळी- दुरुणावर आमटी-भात, वांग-बटाटा भाजी याच्यावर जेवणाची हौस भागवणारे आपण, आपल्याला निमंत्रणाची गरज नव्हती, ह्या खुशीत सबंध किल्ला पाहून घेतला, 


किल्ल्याच क्षेत्रफळ छोट आहे, किल्ल्यावर जुने वाड्यांचे अवशेष, पाण्याचे 7-8 टाके, चुनखडी घाणा सोडला तर चोर खिडकी हा प्रकार भारी होता, गाववाल्यांच जेवण तयार होई पर्यंत घाटकोपरच्या बाबूभाईच फरसाण खायला घेतल व जेवण तयार झाले असेल ह्या आशेने राम मंदिरात जावून बसलो, 


रामशेज किल्ला
रामशेज किल्ला

तेथील परिस्थितीवरून त्यांना अजून वेळ लागण्याची शक्यता होती, आम्ही मंग काढता पाय घ्यायच ठरवल, आबर-चबर खाण्याने आम्ही तस टम्म झालो होतो, आम्हाला जाताना पाहून तेथील महिला मंडळी जेवणाचा आग्रह करू लागली, 


"ओ भाऊ जेवण करून जा, अजून थोडा वेळ लागेल थांबा जरा" वेळेच बंधन पाहून आम्हा वेड्याना कळसुबाईला जायच होत असे सांगून त्यांचे आभार मानून रजा घेतली, एक गोष्ट खेड्यापाड्यात आवर्जून पाहायला मिळेल कि, काही गावकरी परिस्थितीने जरी गरीब असले तरी मनानी खूप श्रीमंत असतात, 


स्वतः जीव टांगणीला टाकून चटणी-भाकरीतील चटकोर का होईना दुसऱ्यासाठी राखून ठेवतील, नाहीतर स्वतः उपाशी राहतील पण अतिथी देवो भव करतीलच! खरच ह्यांचा नाद कुठ, ह्या विचारात 30 रुपये किलोचे संत्री खात पुन्हा CBS नाशिक घाटल, 


तेथून घोटी एसटी पकडून घोटी ह्या ठिकाणी 5:15 वाजता पोहचलो, महामंडळ चौकशी खिडकीत बारी गावाला जाणारी एसटी 6 वाजता असल्याचे सांगितले, कुछ तो गडबड है दया? 7 वाजले तरी गाडी काय फलाटावरती येण्याच नाव घेईना ? 


बारी गावात जेवणाची सोय होईल न होईल मंग जेवनाची सोय इकडून करावी म्हणून मिथुन व रुपेश हॉटेलमध्ये गेले, हॉटेल काही मिनिटाच्या अंतरावर होते, 


ते गेल्यावर काही वेळातच एसटी आली ड्रायव्हर पळत पळत आला कसली तरी नोंद करून गाडी वळवायला लागला, माझे तर इंडिकेटर लागले डोळ्यांपुढे अमृता खानविलकर नाचायला लागली, "आतले वाजले कि बारा, आता जाणार कसा बारी, आता वाजले की बारा म्हणत" मी स्वतःला सावरत सावरत ड्रायव्हरला बोललो, 


ओ काका आम्ही आधीच तासभर थांबलोय तुम्ही 2 मिनिट तर थांबा मित्र जेवण आणायला गेलेत येत्यात इतक्यात, भाई काय थांबायला तयारच नाही म्हणतो आधीच उशीर झालाय बघा फोन लावून आले तर आले नाहीतर निघालो, चौकशी कक्षातून माईकवर गाड्यांची आरोळी ठोकणाऱ्या नियंत्रकाने आमचे तासभराचे सत्र पहिले होते, 


त्याने स्वतःहून ड्रायवरला थोड थांबण्याची विनंती केली, आतातर ड्राइवरभाई छाती फुगवून माग प्रवाश्यांकडे डोकावत होता, माझा फोन आधीच उसन्या power bankच्या सलाईनवर होता, तो गळपटायच्या आत निगडेना कसे बसे 3,4 फोन झाले ती दोघ सुद्धा अक्षरशः पळत पळत आलीत व अकोले एसटीत सामील झालीत.


घाट, वळण पार करीत रात्री 8:30 वाजता बारी गावात पोहचलो, हेच ते कळसूबाईच्या पायथ्याचे गाव, गावात राहायची सोय मारुती मंदिरात होते हे माहित होते व इथे कोणालाही जेवणासाठी आगाऊ रक्कम देवू नये हे मित्रांकडून समजले होते, 


एका गावकऱ्याने आम्हाला धर्मवीर खानावळीचे मालक- संतू खाडे, मारुती मंदिराजवळ यांची गाठ घालून दिली, हे 500 रुपयाच्या मोबदल्यात 10-12 लोकांची राहण्याची सोय करतात, त्यांनी आमची 300 रुपयात सोय केली, 


तेही अंघोळीच्या गरम पाण्यासह मंग आम्ही घोटीवरून आणलेले जेवनासह चायनीज खाद्याचे चाहते रुपेश मोरेनी आणलेल्या चायनीज खावून कधी झोपलो काय समजलं नाही, झोपता झोपता मोरेंनी खोलीच्या समोरील हातपंपावर पहाटे अंघोळ करणार असल्याचे खोली मालकास सांगितले, पहाटे पहाटे 4:30 वाजता आम्ही उठलो, 


कारण लवकरात लवकर कळसुबाई शिखर घाटायचे होते, रात्रभर थंडी खूपच भयाण होती, मंदिरात झोपलो असतो तर शनिवारच्या दिवशी आम्हा मारुती भक्तांची केविलवाणी अवस्था पाहून "मारुतीही हसता हसता म्हणाला असता 


"काय पोरांनो फिरायची लय खाज नव्ह तुम्हासनी, इकडं यायला का मी सांगितलं व्हतं आता बसा रात्रभर टांग टिंग टिंगाक करीत" परंतु sleeping bag असेल तर झोपण्याची लय भारी सोय होईल, पहाटेची थंडी पाहून हातपंपावर अंघोळ करणारे मोऱ्यांनी हातपंपाची काहीएक वाच्यता न करता आमच्या मागोमाग सुमडीत अंघोळ केली व पोहे, चहा आस्वाद घेवून तयार झालो मोहिमेसाठी.


साधारण शिखर चढाई करण्यास सरासरी 3 तास लागतात, आम्ही 6:48 वाजता सुरुवात केली व 1 तासात वरती पोचायचे असं ठरवल, वाटेत आम्हाला वरती मुक्काम केलेले 2 वाटसरू, दुकान मांडणारे गावकरी सोडले तर बाकी चिटपाखरू नव्हतं, थोडा दम लागला तरी आम्ही बसून वेळ न घालवता, फोटो काढण्यात वेळ ढकलला, 

Kalsubai peak

Kalsubai peak


Kalsubai trek

Kalsubai distance 

रानमेवा आता कुठ फुलायला लागला होता, आंब्यांनी कुठ मोहोर पकडला होता, काटेसावराला कुठ फुल उमलली होती, 1 तासात आम्ही कमाल अंतर पार केले होते, 1 तासात कळसूबाईचा नाद करणे शक्य नाही हे समजले होत, मंग त्यात अर्ध्या तासाची भर घातली, 


अतिशयोक्ती वाटेल पण आम्ही थोडाफार रस्ता पळता पळता पूर्ण केली, त्यात शेवटची लोखंडी शिडी चढूून 08:24 वाजता चढून मंदिरासमोर येताच मनात एक वेगळाच आनंद कि महाराष्ट्रातील 1646 मीटर उंचीच सर्वोच्छ शिखर सर केल्याचा तेही 1 तास 36 मिनिटामध्ये मंग थोडा दम खावून कोवळ्या उन्हात निवांत बसलो.


 कारण उन्हाळ्यातही बोचरी थंडी इथे वाहत असते अन माहोल काही वेगळाच होता ! देवी कळसूबाईच्या दर्शनासाठी मंदिरात जाताच पुजारी- श्री: रोंगटे यांनी 10 रुपयाची नोट अगोदरच ताटामध्ये ठेवल्याच निदर्शनास आल, बाकी दोस्तानी थोडी फार देणगी दिली व बॅगेत शिल्लक राहिलेले फरसाण येथील पुजारी यांचे समवेत खाण्यास सुरुवात करताच, 


खाता खाता मोरेनी पुजाऱ्याला "तुमचा हात का वो एवढा कापतोय" असं विचारलं, त्यावर पुजाऱ्याने मला दररोज रात्री चपटी घ्यायला लागते ना त्यामुळे तर हात कापतोय, मी खर खरं बोलतो खोट काय बोलायच, आमच्या मंग फरसाण संपे पर्यंत गप्पा चालू राहिल्या व शिल्लक फरसाण चकण्याची सोय म्हणून पुजारी यांना देवून टाकले, 

कळसूबाई शिखर

कळसूबाई शिखर

वरील दृष्य लाजबाबच कारण महाराष्ट्रातील सर्वोच्छ उंचीवर आपण, सह्याद्रीच्या डोंगर, कड्या, सुळके, त्यात थोड्याफार प्रमाणात धुके पाहत होतो, आता फोटो तर होणारच, भंडारदरा धरण, अलंग, मलंग, कुलंग यांचे साक्षीने फोटो काढले व निगडे यांच्या आग्रहास्तव तेथून काढता पाय घेतला, 

कारण दुसऱ्यादिवशी राणादा व पाठक बाईंच्या लग्नाला जायच होत, शिडी वरून खाली उतरताना दोन फिरस्ते भेटलेले त्यातला शेवटचा शिडीला कचकाटून थांबला होता, घामानी पूर्ण भिजला होता बिचारा, तो आम्हाला उद्देशून आप भाई सबको congratulations असं बरळू लागला,  


आम्ही म्हणालो कारे भाऊ काय झाल, तो म्हणाला इतना उपर आणा आसान नही है, मुझे अब पता चला ट्रेकिंग क्या होती है, मेरी हालत देखो क्या हुई है, पोरग पार हपापल होत, आम्ही त्याला भाई तुम्हे मानना होगा, इतने धुपमे जो आये असं म्हणत, त्यांचा निरोप घेतला, 


खरच त्या पोराला मानायला हव, कारण इच्छाशक्ती न हारता, माघारी न जाता तो शिखरावर आला होता, हीच तर खरी सह्याद्रीची जादू आहे, नाकर्त्यालाही काहीतरी करून धाकवण्याची धमक, प्रेरणा ह्या मातीतून मिळते, हि सह्याद्री भटक्यांना स्वतःकडे आकर्षित करीत असते, 


आम्हा भटक्यांना जगण्याची दुर्दम्य शक्ती व जगण्याचे साहस देते, त्या पोरात एवढ बळ आल त्याच एकमेव कारण आपली सह्याद्रीच कि, यावरुन संभाजी कादंबरीतील एक दृष्य आठवल, शिवाजी राजे औरंग्याच्या आग्रा भेटीला बाळ शंभू राजे समवेत जात होते, तेव्हा माँ जिजाऊ शिवाजी राजेंना उद्देशून म्हणतात,

 

शिवबा आपला शंभू बाळ आजून लहान आहे त्याला सैतानाच्या गुहेत घेवून जाण कितपत योग्य आहे यावर शिवबाराजे उतरले," आऊसाहेब सरड्याच पिल्लू बिळात राहत म्हणून त्याच्या नशिबी सरपटणच येत आम्हाला मात्र गरुडाच पोर सांभाळायचं आहे त्याला संकटाच्या काळदरीत फेकल्याशिवाय त्याचा पंखात बळ फुटणार तरी कसं" अशी वाक्य आठवली कि आमच्यातला हुरूप आजून वाढतो, 


शिडी उतरल्यानंतर खाली एक छोटीशी विहीर आहे, त्यामुळे थंडगार पाण्याची सोय होऊन जाते व इथे बाजूला पत्र्याचा शेड आहेच इथे रात्र काढण्यासाठी, तसेच इथले गाववाले 800 रुपयांमध्ये 4, 5 लोक राहतील असा एक तंबू टोकून देतात, 

Kalsubai height

Kalsubai height


त्यांना काचकूच न करता पैसे देवून टाकावे कारण गावातून मोकळ चढताना आपली जिरते हे बिचारे तर एवढे जड तंबू डोक्यावर आणून तंबू ठोकून देतात, कारण आम्ही ते तंबू उचलून पाहिलेत किती जड आहेत ते, चालता बोलता उतार संपवून सपाटीला लागलो अश्यातच तेथे काठी घेवून 2 पोर धापा टाकत बसली होती, 

ऐरोली, नवी मुंबई वरून आली होती, साधारण 12:30 झाले होते, त्यांनीही न राहवून किती वेळ लागेल अजून हे विचारलच आमचे निगडे म्हणाले सरासरी 3 तास लागतील त्यावर ते पोरग म्हणाल आम्हाला तर मंग 5 तास नक्की लागतील, 


यावर निगडे बोलले तुम्ही एवढ्या भर उन्हात आलात त्यामुळे त्रास होतोय आम्ही पहाटे पहाटे आल्यामुळे लवकर पोहचलो अशी समजूत घालून आमच त्रिकुट धर्मवीर खानावळीत बाजरीची भाकरी, सुखा बटाटा, वरण भात, शिरा खावून कसारा जीप पकडून मुंबईकडे रवाना झालो, मनात कळसूबाईच्या आठवणी साठवून...


कळसूबाई आणि भंडारदरा
कळसूबाई आणि भंडारदरा

Kalsubai trek 

निसर्गान मनसोक्त उधळलेले सोन म्हणजे सह्याद्री

डोंगर-दऱ्या, घाट-खिंडी, गड-किल्यांची खाण म्हणजे सह्याद्री

सिहांची बुलंद छाती अन गर्द गरुडाच घरट म्हणजे सह्याद्री

तोफगोळे, दगड-धोंड्यासह, गनिमी काव्याची चाल म्हणजे सह्याद्री

शिवरायांच्या स्वराज्यावरील अभेद्य ढाल म्हणजे सह्याद्री

हरणाऱ्यालाही पुन्हा पुन्हा लढण्याची ताकद म्हणजे सह्याद्री

ठेचालून रक्तबंबाळ पडणाऱ्याला मदतीचा हात म्हणजे सह्याद्री


मर्द मराठ्यांचे शौर्य, पराक्रमाची गाथा म्हणजे सह्याद्री

आरे घोड्यांच्या टापांचा, तलवारीच्या घणाघाटाचा आवाज म्हणजे सह्याद्री

जगण्याची आस सह्याद्री, मरण्याच निमित्त सह्याद्री, साहसाची परिसीमा सह्याद्री, इतिहासाचे सोनेरी पान म्हणजेच सह्याद्री


धन्यवाद 
© शैलेश कदम.

हवं सुद्धा वाचा - 

Tags - कळसुबाई शिखर | kalsubai peak | kalsubai trek | kalsubai shikhar | kalsubai height | kalsubai distance 


Post a Comment

Previous Post Next Post